"देवेन काय मागेल? माझ्याकडे अस काय आहे जे त्याला हवे आहे? मी त्याला काय देऊ शकते?" एक ना दोन हजार प्रश्न शोनाच्या मनात घोळू लागले. देवेनच्या शब्दांकडे लक्ष देऊन ऐकू लागली.
" तुला प्रश्न पडला असेल ना? काय हवे आहे याला?
देवेन मोठ्यांदा हसला. शोनाला त्यात एक राक्षसीपणा वाटला.
"शोना ह्या सगळ्या वस्तू तुझ्या होतील. जे तुला सामानात मिळाले ते आणि बरेच काही. पण एका अटीवर"
"माझ्याशी लग्न करशील?"
देवेन ची मागणी ऐकून शोना चपापली. थोडेसे गोंधळून ती काही बोलणार तेवढ्यात तोच म्हणाला.
"मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिले होते तेव्हाच तू मला आवडली होतीस. पण पुढे भेटण्याचा योगच नाही आला."
"पण.." शोना म्हणाली.
"एक मिनिट ...मला पुर्ण बोलू दे."
"कोकणातून परत आल्यावर माझ्या डोळ्यासमोर फ़क्त तुझाच चेहरा होता. तुझ्याशिवाय मला दुसरे काही सुचत नव्हते. मग मी मूंबईला आलो. तुझ्या कंपनीचे नाव मला माहित होते. ती कुठे आहे ते शोधून काढले. तिथून तुझ्या घराचा पत्ता ही मिळाला मला."
"माफ कर माझ्या एवढ्या धिटाईबद्दल."
"गेले सहा महीने मी तुझा पाठलाग करत आहे. तुझ्याशी बोलण्याचे मनात आले पण कोणत्या कारणाने तुला भेटावे ते मला कळेना."
"म्हणून अश्याप्रकारे मनस्ताप द्यायचा असे ठरवलेत क?"
"मला वाटलेच तू हा प्रश्न विचारणार म्हणून. मी जे काही केले ते फ़क्त आपल्या भेटीत काहीतरी वेगळेपणा असावा यासाठी. तुला घाबरवण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता."
"मी तुला खुप सुखात ठेवेन. माझ्याकडील सगळ्या वस्तू, सुखसोयी तुझ्याच असतील. तुझा कोणतही शब्द मी जमीनीवर पडू देणार नाही. तुझ्या आयुष्याचे सोने होईल."
"खरे तर मीच पावन होईन जर तू माझ्या आयुष्यात आलीस तर."
"मी तुम्हाला ओळखतही नाही आणि मी हो कशी म्हणू? मला तुमच्याशी लग्न करायची बिल्कूल इच्छा नाही."
"शोना, नेहमी जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते तीला स्विकारावे, ती व्यक्ती तुम्हाला खूप सुखी ठेवते."
देवेनच्या डोळ्यात खरेपणा दिसत होता. पण शोना काहीही समजण्याच्या मनस्थितीत नव्हती. डोकं जड झालं होतं. ती शांत बसली होती.
"तुला वेळ हवा असेल तर मी जरूर देईन. आज तू या वाड्यातच रहा. खूप रात्र झाली आहे आता. आपण जेऊन घेऊ या."
दोघे डिनर टेबल कडे गेले. जेवण करताना शोना एक शब्दही बोलली नाही. देवेनच्या डोळ्यांना डोळे ही देववत नव्हते तीला. थोडेसे जेवल्यावर देवेनने एका नोकराला बोलावून शोनाच्या राहाण्याची सोय पाहूण्यांच्या खोलीत करायला सांगीतले.
शोना त्याच्या मागोमाग निघाली.
तिचे डोके बधीर झाले होते. एकाहून एक अनपेक्षित घटना घडत होत्या आणि शोनाला काहीच मार्ग सापडत नव्हता.
थकलेल्या शरीराने ती बिछान्यावर आडवी झाली. पण झोप येईना. येईलही कशी? अशा अनोळखी व्यक्तीच्या अनोळखी घरी अचानक येऊन कोणाला शांत झोप लागेल?
डोळे मिटले की सगळे प्रसंग डोळ्यापुढे येत होते. ते सामान हरवणे, परत मिळणे, त्यातले अनोळखी सामान, ती काळी गाडी आणि अकस्मात भेटलेला हा प्राणदाता.
देवेन....तसा फ़ारसा वाईट व्यक्ती नाही. पण मी त्याला ओळखत देखिल नाही. असा कसा मी त्याच्यावर विश्वास ठेऊ.
एखादी व्यक्ती माझा एवढा पाठलाग का करेल? जर हे प्रेम नाही तर मग माझ्याकडून अपेक्षा ठेवण्यासारखे काहीच नाहिये.
असे म्हटले जाते की जो प्रेम करतो त्याला स्विकारावे मग जास्त सुखात जिवन जाते. तसे माझ्या जिवनात कोणीही खास नाही मग मी देवेन चा स्विकार का करू नये?
देवेन सुखवस्तू कुटूंबातला असल्याने माझेही पुढचे आयुष्य ऐशो-आरामात जाईल. आईला ही व्यवस्थित सांभाळता येयील.
शोनाच्या मनातले विचार असे बदलू लागले आणि शेवटी तिने देवेनचे प्रेम स्विकारायचे ठरवले.
दुस-या दिवशी शोना सकाळी उठली. फ़्रेश होऊन परत त्या दिवाणखान्यात गेली. तिथे देवेन नाश्त्यासाठी तिची वाट पाहात होता.
नाश्ता करता करता देवेनने पुन्हा शोनाला विचारले आणि ह्यावेळेस मात्र शोनाने होकार दिला.
देवेन त्या दिवशी खूप खूश होता. त्याने शोनाच्या आईला बोलवून घेतले. आणि गुजरातहून त्याच्या आजोबांनाही बोलावले. देवेन आणि देवेनचे आजोबा एवढाच परिवार होता. त्यांची वडिलोपर्जित भरपूर संपत्ती होती. दोघांचे लग्न खुप थाटामाटात झाले. शोना खूश होती कारण शोनाच्या आईला देवेन जावई म्हणून खुप आवडला.
इकडे देवेन खूश होता कारण त्याच्या आजोबांना जशी सून हवी होती तशीच मिळाली.
दोघांचे नविन जिवन सुरू झाले. अगदी नजर न लागो एवढे सुख मिळाले होते शोनाला. पण कुठे तरी पाणी मुरत होते. शोनाच्या संसाराला नजर लागणार होती.
************************************************************
Monday, May 12, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment