Thursday, April 24, 2008

Untitled Story Part IV

मोबाईलच्या आवाजाने शोना भानावर आली. फोन त्याचाच होता.

"शोना, धन्यवाद तू माझ्या विनंतीला मान देऊन गाडीत बसलीस. घाबरू नकोस. इकडे पोहोचलीस की तुला सर्व सांगेन."

ती काही बोलणार तेवढ्यात फोन बंद झाला. त्याच्या बोलण्याने ती जरा सावरली. "अजुन ही किती सालसपणे बोलतो."

पहिल्या भेटीत शोना त्याला पाहू ही शकली नव्हती. शोना आणि सरोज किना-यावर आल्यावर बेशुद्ध झाल्या होत्या. दोघीना होस्पिटल मधे नेण्यात आले तेव्हा हा इसम - देवेन देखील दोघीबरोबर हॉस्पिटलमधे गेला. दोघी शुद्धीवर येई पर्यंत तो निघून गेला होता. त्यांच्या कंपनीतील इतर जणांनी त्याच्याबद्दल तिला सांगितले आणि त्याचा मोबाईल नंबर दिला. त्या दिवशी तिने संध्याकाळी आभार मानण्यासाठी त्याला फोन लावला.

"हॅलो, कॅन आय स्पिक विथ मिस्टर देवेन?"

"येस, स्पिकींग."

"आय एम शोना स्पिकींग."

"ओह, येस. बोला. आता तुमची तब्येत कशी आहे?"

एकदम अस्खलीत मराठीत त्याने उत्तर दिले.

"तुम्ही काल जे उपकार माझ्यावर केलेत त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. खरच तुम्ही नसता तर आज मी हा दिवस पाहू शकले नसते. आता मी या उपकाराची परतफेड कशी करू?"

देवेन थोडासा हसला आणि म्हणाला,"असे बोलून मला फार मोठे बनवू नका. उपकार कसले त्यात. देवाच्या कॄपेने मी तिथे हजर होतो. मानायचे असतील तर देवाचे आभार माना."

"हा तुमचा विनय आहे. या उपकाराची परतफेड नक्कीच करायची आहे मला. तुम्ही मला भेटू शकाल का?"

"जशी तुमची इच्छा. पण मी कोकण सोडून घरी निघालो आहे आज. तुम्हाला भेटू शकणार नाही. आणि राहीली उपकाराची परतफेड. जर नशीबात असेल तर परत आपली भेट होईल अशी आशा करू.तेव्हा नक्की माझी अट पुर्ण करा."

"हो नक्की. तुम्ही माझे जिवनदाता आहात. तुमची परतफेड मी नक्की करेन."

नंतर अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारून तिने फोन ठेवून दिला. देवेन एक व्यावसायिक होता. त्याचा इम्पॉर्ट-एक्सपॉर्टचा व्यवसाय होता. आवाजावरून साधारण ३०-३५ वर्षांचा असावा असे वाटत होते. त्याचे कुटूंब गुजरात मधे स्थायिक होते आणि कामानिमित्त हा नेहमी इतर देशांच्या सफ़रीवर जात असे.

देवेनचा आवाज मोठा विनयशील होता. त्याला भेटून धन्यवाद व्यक्त करता आले नाही म्हणून शोनाला खूप वाईट वाटले. परत कधीतरी भेट होइल याच आशेवर ती होती.

आणि पुढील भेट अशी अनपेक्षितपणे घडेल असे वाटले नव्हते.

"आता देवेनचे काय म्हणणे आहे आणि त्या उपकाराची परतफेड म्हणून काय मागेल तो?"

"त्या सामानाचा काय अर्थ आहे?"

देवेन भेटेपर्यंत या प्रश्नांची उत्तरे मिळणे शक्य नव्हते.

गाडी एका बंगल्यासमोर थांबली. गाडीच्या ड्रायव्हरने गाडीचा दरवाजा उघडून तिला बाहेर येण्याची विनंती केली. शोना गाडीतून उतरली तेव्हा दारवानाने तिला त्याच्या सोबत येण्याचा इशारा केला. ती त्याच्या मागोमाग चालत होती. तो खूप मोठा बंगला होता. दरवानाने तिला तळमजल्यावरील एका दिवाणखान्यात बसवले आणि "सर येतील. तो पर्यंत बसा." असे सांगून तो निघून गेला. त्या खोलीतील प्रत्येक वस्तू पुरातनकालीन वाटत होती. एका म्युझीयम मधे असावे तसे सूंदर नमूने होते. शोनाचे कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नव्हते. तिचे डोळे दरवाज्यावर खिळले होते.

कोणाचीतरी चाहूल लागली तशी शोना खुर्चीत सावरून बसली. एक हसतमूख गॄहस्थ दिवाणखान्यात आला. साधारण सहा फूट उंची असलेला, साधारण शरीरयष्टी असलेला हा युवक देवेन होता.

"वेलकम शोना...वेलकम."

त्याने स्वागत केले. शोना कसनूसे हसली. कसे व्यक्त व्हावे तिला कळत नव्हते.

"तुम्ही मला इथे का बोलावले आहे?"

"आपण मागे जेव्हा फोनवर बोललो होतो तेव्हा पुन्हा भेटू असे म्हटलो होतो. आज मीच नशिबाला वळवून आपली भेट घडवून आणली."

"ते ठिक आहे. पण मला फोन करून ही मला भेटू शकला असता आपण. हे असे करावे असे का वाटले तुम्हाला?"

"ओह... मला अश्या एडव्हेंचरस गोष्टी करायला आवडतात.त्यामूळे जगण्यात मजा येते असे मला वाटते."

" एडव्हेंचरस???.. त्या सामानाचा अर्थ काय आहे? नाविन्यपुर्ण काहीतरी करण्याच्या नादात तुम्ही आजूबाजूच्या लोकांनाही असाच त्रास देता का?"

"मी तुला घाबरवले असेल तर मला माफ कर शोना. माझा असा प्रयत्न नव्हता."

"ठीक आहे. तुमचे काय म्हणणे आहे मला लवकर सांगा म्हणजे मी घरी जाऊ शकेन."

"जशी तुझी मर्जी. पण तू थकून आली आहेस. जरा फ्रेश होऊन मग आपण बोलूया का?"

"नाही. आताच बोला."

"बरं, मागे तू म्हणाली होतीस की उपकाराची परतफेड करायची आहे. मी आज काही तुझ्याकडे मागितले तर देशील का?"

"हो मला आठवते आहे. तुमच्यामुळेच मी आज हे जग पाहू शकत आहे. मी काही खूप श्रीमंत नाही आहे.बोला तुमची काय अपेक्षा आहे?"

शोनाच्या मनात चलबिचल वाढू लागली. देवेन काय मागेल?

**************************************************************************

No comments: