Thursday, April 24, 2008

Untitled Story Part II

स्टेशनबाहेर पडताच ती डावीकडे जाणा-या रस्त्यावरुन सरळ चालू लागली. हे सगळे स्वप्नच वाटत होते. तिने स्वत:लाच चिमटा काढून पाहिले.

"आई ग....नाही हे स्वप्न नाही. मग हे असे का घडतय?"

चालता चालता ती एका सुनसान रस्त्यावर आली. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार शेतं वा-यावर डोलत होती. एवढं सुखद वातावरण ..पण शोनाच्या चालण्याचा वेग वाढू लागला. चालता चालता थबकली.

"मी नक्की जातेय कूठे?"

रस्त्याच्या कडेला वडाच्या पारावर ती बसली. बॅग उघडली आणि एक एक सामान न्याहाळू लागली. खूप महाग सामान होतं ते. " एवढे किमती सामान कोणी असे सोडुन का जाईल?"

तिच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले.

" हे सामान कुणा स्मगलरचे तर नसेल ना? आता माझा पाठलाग करत तो येयील. मला जिवानिशी तर मारणार नाही ना? "

"बापरे कोण माणूस असेल हा.... नक्किच भयानक असेल..आणि त्याला मीच का बरे सापडले.? आता ही रिस्क घेऊन फ़िरणे शक्य नाही. हे सामान इथेच झाडाखाली सोडून निघून गेलेलं बरं. हम्म जाताना ह्यातले थोडेफ़ार पैसे घरी जाण्यासाठी वापरु."

"पण ह्या पैश्याच्या मागावर पोलिस असतील तर ते नोटांची सिरीज नक्कीच पकडतील. की सरळ पोलिसांकडे जावं?"

" नको नको नस्ते उद्योग मागे लागतील एकतर अनोळखी शहर आणि त्यात पोलिसांनी जर चौकशीसाठी पोलिसचौकीत ठेवले तर? उगाच आईला इकडे बोलवायला लागेल. बिचारी आधीच आजारी असते आणि त्यात अजून भर पडेल."

शोना तिच्या आईबरोबर मुंबईला राहायला होती. त्यांना मुंबईत येऊन दोनच वर्षे झाली होती. वडिलांच्या सावलीपासून ती लहानपणापासूनच वंचित होती. आईने खुप कष्टाने तिला वाढवले शिकवले होते. आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती आणि शोनाला आपल्या आईला कुठल्याही प्रकारे त्रास द्यायचा नव्हता.

संधिप्रकाश सरून अंधार पडू लागला होता. त्या मोकळ्या रस्त्यावर एक चिटपाखरू ही नव्हते. मधुनच एखादी गाडी भुरकन निघून जायची. आता मात्र शोनाला भिती वाटू लागली. कुठे जावे ? काय करावे?

तेवढ्यात एक ट्रक मोठ्यांदा हॉर्न वाजवत गेला आणि शोनाच्या सामानातून कंप जाणवू लागला. एका फोनची बेल ही ऐकू येऊ लागली.

" ओह ..मी कशी विसरले? " तो सामानातला मोबाईल वाजत होता.शोनाच्या काळजात धस्सं झालं. " कोणाचा फोन असेल? " सामान उघडून तिने तो मोबाईल बाहेर काढला. त्याच्या स्क्रीनवर एक नंबर झळकत होता.

" उचलू की नकॊ.. नकोच उचलायला."

फोन वाजायचा बंद झाला. शोनाच्या चेह-यावर हसू आले.

"अरे कसे विसरले मी? हा मोबाईल.. आता मी घरी फोन करून निताचा पत्ता विचारून घेते आईला. मग तिच्या घरी जाईन मी."

ती घरचा नंबर दाबू लागली आणि परत फोन वाजू लागला.

परत " उचलू की नकॊ..?"

तिने तो फोन उचलून कानाला लावला. आणि एक मोठी काळी गाडी तिच्या समोर येऊन उभी राहीली. तिचा दरवाजा उघडला. फोनमधून आवाज आला

" शोना...."


*************************************************************************************

No comments: