Thursday, April 24, 2008

Untitled Story Part III

"शोना.... गाडीत बस.."

"हो! हो! हा तोच ओळखीचा आवाज आहे."

शोना चूपचाप गाडीत जाऊन बसली.

कोणाचा होता हा आवाज की शोना काहीही विचार न करता गाडीत बसली. गाडी संथ गतीने चालत होती. गाडीमधील ए.सी. चालू होता. पण शोनाच्या कपाळावर घामाचे थेंब दिसत होते. तिची चलबिचल चालली होती.

"गाडीत बसून ठीक केले की नाही.हे सगळे सामान फ़ेकून मी गेले असते तरी चालले असते. आता पुढे काय होणार? आणि तो इथे कसा काय आला?"

"तो त्याचाच आवाज होता. तसाच भारदस्त आणि दडपण वाढवणारा. इतक्या दिवसांनी हा कुठून आला आणि असे का वागत आहे? काय हवे आहे त्याला माझ्याकडून?"

शोना त्याच्याबद्दल विचार करू लागली. तीची आणि त्याची ओळख एक वर्षापूर्वी कोकणात झाली होती. शोना कंपनी ट्रीपच्या निमित्ताने कोकणात गेली होती. दोन दिवसांची सहल होती आणि सगळे खुप खूश होते. ते मूंबईहून रात्री निघाले होते.पहाटे कोकणला पोह्चून ताजे तवाने होऊन ते फ़िरायला बाहेर पडले. शोनाही आपल्या मैत्रीणींसोबत तिथल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत होती.

मस्त नारळी-पोफ़ळीच्या बागा आणि प्रदूषणरहीत हवा. सगळ्यांना ही हवा अशीच साठवून परत न्यावीशी वाटत होती. शोनाला असा निसर्ग नेहमीच आवडत असे. अगदी घरच्या सारखे वाटले तिला. जशी सुंदरता अवतीभवती होती तशीच तिथली माणसे ही सालस होती. शोनाच्या रेसॉर्टमधे छोटे छोटे कौलरू घरे होती. ती ह्या सगळ्या ओफ़ीसमधील मंडळींना दिली होती. एक इवलेसे गावच वाटत होते ते. त्या ठिकाणाच्या मागेच समूद्रकिनारा होता. घरात असताना देखील लाटांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. जसा काही तो स्वत:कडे बोलवत आहे. शोना तिच्या मैत्रीणीबरोबर, सरोजबरोबर राहायला होती. दोघी साधारण एकाच वयाच्या होत्या. म्हणून दोघींचे खुप पटायचे. दोघी सारख्या एकत्र असायच्या आणि सारखे सारखे हसायच्या. दोघींच्या जोडीला सगळे सीता-गीता म्हणायचे. दोघीही त्या रूममधे अस्वस्थ झाल्या होत्या. कधी एकदा समूद्राकडे जाऊ असे झाले होते त्यांना. पण..बाकीचे सगळे सिनिअर मेंबर बरोबर असताना ह्या दोघींना लाटांमधे जाता आले नसते.

सरोज म्हणाली,"शोना,आपण एक काम करू शकतो.हे सगळेजण जमा होत आहेत तो पर्यंत समूद्राकडे जाऊन येऊ. जवळच आहे."

"पण आपल्याला कोणी जाऊ देणार नाही."

" सांगायची काय गरज आहे? लगेच जाऊन अर्ध्या तासात येऊ परत. आपण लहान आहोत का आता? आपण स्वत:ची काळजी घेऊ शकतो."

शोनाच्या मनाला हे पटले नाही. पण एकीकडे तिची समुद्राकडे जाण्याची ओढ काही कमी होईना आणि शेवटी दोघींनीही कोणालाही न सांगता जायचे ठरवले.

चोरपावलांनी रूमबाहेर येऊन त्या सागराकडे जाऊ लागल्या. समूद्रावरून थंडगार वारे येत होते.प्रसन्न वातावरण आणि समॊर घोंगावणा-या लाटा. शोनाला सगळे स्वप्नच वाटत होते.

"सरोज , तुला पोहता येते का?" शोनाने विचारले.

"हो, मी चांगली पोहते."

दोघी हातात हात घालून समूद्रकिनारी चालू लागल्या. समुद्राची मऊ वाळू पायाला गुदगुल्या करत होती.सकाळी जास्त कोणी समूद्रकिनारी नव्हते. समूद्राची लाट आली की त्यांच्या पायाला स्पर्श करून जात होती. दोघींनी थोडेसे पाण्यात जायचे ठरवले. त्या अजून थोडे समूद्रात शिरून उभ्या राहील्या. जसजशी लाट येत होती, तसतशी त्यांच्या पायाखालची वाळू त्यांना आत खेचत होती. ती वेळ ओहोटीची होती आणि अशा वेळी अजून पाण्यात जाणे धोक्याचे होते. त्या दोघींना ही तेवढी समज नव्हती. अजुन लाटा अंगावर झेलण्याच्या नादात दोघी कमरे एवढ्या पाण्यात शिरल्या.

तेवढ्यात कसा कोण जाणे, सरोजचा पाय सरकला आणि ती समुद्राच्या पाण्यात घसरली. सरोजला पाण्यात खेचली जाताना पाहून शोना घाबरली. ती ही पाण्यात जाऊन सरोजला वर आणण्याचा प्रयत्न करू लागली. आणि शोनाचाही पाय सरकला.

दोघीही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्या. एकमेकींना सावरू लागल्या पण समूद्रात खेचल्या जाऊ लागल्या.दोघींनी ही मदतीसाठी ओरडायला सुरूवात केली.

किना-यावर दूरवर एक इसम पोहत होता. तो या दोघींची हाक ऐकून मदतीसाठी धावून आला. तो पाण्यात शिरला आणि दोघींच्या जवळ जवळ जाऊ लागला. जवळ पोहोचताच त्याने दोघींनाही त्याला पकडायला सांगीतले आणि पाणी आत खेचत असतानाही प्रवाहाविरुद्ध दोघींना तो खेचू लागला. किना-यावर पोहोचताच क्षणी त्याला खूप धाप लागली होती.

पाण्याबाहेर येता क्षणीच शोनाला भोवळ आली. तो पर्यंत किना-यावरच्या गर्दीने एक ऍम्ब्यूलन्स बोलावली होती. शोनाला आणि तिच्या मैत्रीणीला त्यात घालून हॉस्पिटलमधे नेण्यात आले. आणि दोघींनाही त्या दिवशी खूप बोलणी ऐकावी लागली.

हा प्रसंग आठवला आणि शोनाच्या चेह-यावर हसू आले. हिच त्याची पहिली ओळख. त्या दोघींना वाचवणारा इसम तोच होता.

"पण तो असा अचानक कसा आला आणि माझ्या प्राणदात्याला आता माझ्याकडून काय अपेक्षित आहे?"

अन परत शोनाच्या हातातील मोबाईल वाजू लागला.

**************************************************************************

No comments: