रस्त्यावरून जाणारी एक एशियाड बस. रस्त्याच्या दुतर्फा सुंदर हिरवीगार शेतं, बहरलेली झाडं आणि एकदम पावसाळी वातावरण. खिडकीच्या कडेला बसून हे बघण्याची मजा काही औरच असते ना. शोना अशीच खिडकीबाहेर पहात होती. काही कामानिमित्त ती सांगलीला चालली होती. ह्या अशा वातावरणात तिला नेहमीच आल्हाददायक वाटत असे. एकदम प्रसन्न, बस्स.... अस्संच प्रवास करत राहावं. मधूनच पावसाची झिरीप यायची आणि तिच्या चेह-यावर काही शिंतोडे उडवून जायची. आणि मग शोनाला बाहेर पडण्याचा मोह व्हायचा. आता चालत्या बसमधून कसे उतरणार? मग हा उनाड पाऊस परत येऊन वाकूल्या दाखवून निघून जायचा.
शोनाकडे एकच अडकवायची सुटसुटीत बॅग होती.अगदी एक-दोन दिवसांचे सामान बसेल एवढीच मोठी. सांगलीत तिच्या जिवलग मैत्रीणीच्या घरी राहाण्याचा तिचा बेत होता. खूप वर्षांनी त्या भेटणार होत्या. त्याच विचारांमधे गुंतत गुंतत तिचा कधी डोळा लागला तेच कळाले नाही तिला.
करकचून ब्रेकचा आवाज ऐकून ती धडपडत उठली. पहाते तर गाडी सांगली स्थानकावर उभी होती. गाडीतून सर्व प्रवासी उतरले होते. ती एकटीच होती बसमधे. खिडकीतून बाहेर पहाते तर बरीच संध्याकाळ झाली होती. आजूबाजूला पहावे तर तिची बॅग कुठेही सापडेना तिला.
ती पळत पळत बसमधून खाली उतरली आणि चौकशी खिडकीकडे गेली. तिथे एक इसम बसला होता. तीला पहाताच तो म्हणाला, "बोला मॅडम.".
ती म्हणाली, "मी आत्ताच मुंबई-सांगली गाडीतून आले. माझ्याजवळ माझी एक बॅग होती. ती आता सापडत नाहीये."
"कशी होती तुमची बॅग? "
"ती आकाशी रंगाची होती. हवाई असे लिहिले होते त्यावर. एका दिवसाचे कपडे, मोबाईल आणि माझे पैसे सगळे होते त्यात."
"अहो बाई, मग अशी बॅग वा-यावर नाही सोडून द्यायची. नाही सापडली तर काय करणार तुम्ही?"
"तुम्हाला सापडली का अशी बॅग?"
"मी काय सगळ्यांच्या सामानावर लक्ष ठेवत बसू का? असे बरे नाही बघा. स्वत:च्या वस्तु स्वत: सांभाळायच्या. हरवल्यावर मग यंत्रणेला दोष देऊ नये. आम्हाला काय काम धंदे नाहीत काय?"
शोना चिडलीच. म्हणाली,"अहो साहेब, मुद्द्याचे बोला. मला सामान कुठे मिळेल?"
"बघा नाही सापडली तर पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार द्या. सामान मिळेल याची काही खात्री नाही."
"तुम्ही सांगणार आहात की नाही?"
"बरं, शेजारच्या खोलीत काही पिशव्या आहेत. त्यात तुमची बॅग आहे का पहा."
शोना मनात म्हणाली ,"हे सरळ सांगता आले असते."
शेजारी एक छोटीशी अडगळीची खोली होती. तिथे काही सामान अस्ताव्यस्त पडले होते. पण अखेर सगळे सामान धुंडाळून तिची बॅग काही सापडली नाही.
आता मात्र तिला रडू कोसळले. या अनोळखी शहरात कुठे जाईल ती? ना पैसा, ना मोबाईल. तिला तिच्या मैत्रिणीच्या घराचा पत्ता किंवा नंबर काहीच लक्षात नव्हते. परत मुंबईला फोन करावा तर पैसे नव्हते. ती खोली बाहेर आली. बाहेरच्या बाकावर बराच वेळ बसून राहीली. काय करावं ते तिला समजेना. दोन्ही हात चेह-यावर घेऊन ती हळू हळू रडू लागली. तसा थोडा थोडा पाऊसही यायला लागला. जणू तिच्या दु:खात तिला साथ द्यायला. येणारी जाणारी माणसे तिच्याकडे बघत जात होती. पण ती काहीही समजण्याच्या मन:स्थितीत नव्हती. या अगोदर असे काही घडले नव्हते तिच्याबरोबर.
तेवढ्यात तिचे लक्ष त्या खोलीच्या दाराच्या दुस-या बाजूला असणा-या बाकड्याकडे गेले आणि तिच्या आनंदाला पारावार राहीला नाही. त्या बाकाखाली एक पिशवी होती. आकाशी रंगाची आणि हवाई लिहिलेली. ती चटकन उठून गेली आणि चैन उघडून आतले सामान तपासून पाहू लागली. उघडताना तिच्या मनात आले की नक्किच चोराने आतलं सामान लंपास करून बॅग सोडून दिली असेल. पण आत पाहावे तर तिचे सगळे सामान त्यातच होते. तिची मनी पर्स, त्यातले पैसे,तिचे कपडे, काही पुस्तके..अगदी जसेच्या तसे.तिला एकदम हायसं वाटलं. पण मोबाईल काही केल्या सापडेना.
आणि त्या सामानात तिला काही अनोळखी सामानही मिळाले. जे तिचे नव्हते.
तेवढ्यात समोरून चौकशी खिडकीवाला इसम येत होता.
"मिळालं वाटतं सामान."
"हो"
"जाता जाता सामान मिळल्याची नोंद करुन जा."
सही करून शोना निघाली. तिच्या डोक्यातून हे विचार जाईनात. हे सामान कोणाचे आहे? माझ्या बॅग मधे कुठून आले? कोणी ठेवले? का ठेवले?
तिला तिच्या सामानात काही हजाराच्या नोटा, एक सुंदर तलम कापडाचा नक्षीकाम केलेला एक सलवार कमीझ, एक सूंदरसा हि-यांचा सेट आणि अजून बरेच काही. खूप महाग वस्तू होत्या या.
तशीच बॅग घेऊन ती स्टेशनबाहेर आली. नानात-हेचे विचार येत होते मनात. काय चालले आहे हे सगळे?
*************************************************************************************
Thursday, April 24, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment